गणेश चतुर्थीचं महत्त्व, पूजा, कथा | Importance Of Ganesh Chaturthi | History | Significance | Marathi
श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.
मित्रांनो या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेशपूजनाशी संबंधित काही कृती आणि त्यांमागील शास्त्र पुढे सांगितले आहे. आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेऊया.
श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखामध्ये दिली आहे. प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्लोक बघूया.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।
याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.
श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.
गणेश चतुर्थीचं महत्त्व
संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.
श्री गणेशाची मुर्ती
श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातिच्याच मुर्तीचा आग्रह धरावा.
प्रतिष्ठापनेची पुजा
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य इ. सोळा उपचारांनी षोडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुलं, शमी आणि दुर्वा तसंच विविध पत्रीपानं या पूजेमध्ये वापरली जातात. या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीसोबतच त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो. तेव्हाच गणपतीचं विसर्जन केलं जातं. मित्रांनो भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडेच हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा असावी. या पत्रींमधे अधिकतर पत्री या औषधी असल्याचे आपल्याला आढळते.
गणेश चतुर्थी आणि हरतालिका व्रत
देशभरात महादेव आणि पार्वतीची पूजा करून स्त्रिया हरतालिका व्रत करतात. याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या श्रद्धेसह विवाहित तर मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तीभावाने करतात. म्हणूनच याचे काही खास नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत ते व्रत करणार्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे-
हरतालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी ग्रहण करत नाही.
एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे.
या दिवशी घर स्वच्छ असावं. घरातील कचरा बाहेर करावा.
रात्री जागरण करुन भजन-कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहे.
शास्त्रांप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका, सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांना देखील करण्याची आज्ञा आहे.
पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूने प्रतिमा तयार करावी.
पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील वडिलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा.
दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावे.
मित्रांनो चुकुन करुन नये हे 5 काम
क्रोध करणे टाळावे
हरतालिका तृतीया व्रत दरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर रहावे. या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेंदी लावण्यात येते.
अपमान करु नये
तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करु नये परंतू या दिवशी चुकुन देखील वडिलधार्यांना अपशब्द बोलू नये. त्यांचे मन दुखावेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये.
झोपू नये व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही. दिवसा तर झोपू नाहीच परंतू रात्री देखील जागरण करावं. हे व्रत करणार्यांनी रात्री जागरण करुन भजन- कीर्तन करावं.
खाणे-पिणे टाळावे
हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे. कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतू शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी, गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करु शकतात. तरी या दिवशी दूधाचे सेवन करणे टाळावे. तसेच अन्न घेणे देखील टाळावे. व्रत करण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तामसिक भोजन टाळावे. प्रेमाने वागावं नवर्याच्या दिर्घायुष्यासाठी करत असलेल्या व्रत दरम्यान नवर्याशी भांडण, वाद करणे टाळावे. नवर्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण तरी कसं होणार?
गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू
गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं आणि सुरूवात होते ती गणेशोत्सवाच्या पर्वाला. पाहूया गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. जाणून घेऊया गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू.
गणपतीचा आवडता नेवैद्य मोदक
गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केला जातात किंवा तळणीचे ही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहात नाहीत.
दुर्वा
गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.
जास्वंद
दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.
गणपतीच्या आरत्या
सुखकर्ता दुःखहर्ता… ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते. प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.
मित्रांनो आता अनंत चतुर्दशीचे महत्व आपण जाणून घेऊ या
अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले. सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे, तर दीड आणि पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाले आहे. मात्र, आता जस जसा अनंत चतुर्दशीचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसतशी गणेश भक्तांच्या मनातील चलबिचल वाढू लागते. कारण गेले 10 दिवस ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजा केली, गोड कौतुक केले त्याचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली असते. हा विचार व तो क्षण गणेश भक्तांना खूप भावूक करणारा असतो.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. तर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. यात घरगुती गणपतींसोबत मंडळांच्या मोठ्या गणपतींचे विसर्जन सुद्धा याच दिवशी होते. मात्र, गणेश भक्तांसाठी हा भावूक करणारा दिवस असल्या तरी पुढच्या दिवशी लवकर यावे यासाठी जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. पण अनंत चतुर्थीला बाप्पाचे विर्सजन का केले जाते? असा प्रश्न आपल्या पैकी बऱ्याच जणांना पडत असेल, तर आता जाणून घेऊयात या मागची दंतकथा.
दंतकथा
धार्मिक ग्रंथानुसार, असे सांगण्यात येत की, महर्षी वेदव्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. ही कथा गणपती अक्षरशः 10 दिवस लिहित होता. जेव्हा वेदव्यास कथा सांगत होते तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यामुळे आपल्याला हे माहित नव्हते की, या कथेचा गणपतीवर काय प्रभाव पडत आहे.
कथा पूर्ण झाल्यावर जेव्हा महर्षीने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचे शरीराचे तापमान फार वाढले होते. त्यांना ताप आला होता.
त्यावेळी महर्षी वेदव्यासांनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील ताप थोडा कमी झाला. त्यामुळे असे मानले जाते की गणपती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात.
धन्यवाद
Comments